दोन महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर शाळांच्या नूतनीकरणाला गती; आधुनिक सुविधांसाठी आपची मागणी
जिल्हा प्रतिनिधी
वर्धा
वर्धा : वर्धा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या शाळेच्या नुतनीकरणाचा प्रश्न आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सदस्य मंगेश शेंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातुन उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम खामगावकर यांच्याशी चर्चा करून या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
गेल्या दोन महिन्यांपासुन आम आदमी पार्टीच्या टीमकडुन या विषयासाठी बैठका आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, नगरपरिषद मुख्याधिकारी विजय देशमुख तसेच वर्धा नगरपरिषदेतील नगरसेवकांच्या भेटी घेऊन विविध स्तरांवर चर्चा करण्यात आली. संबंधित कामाच्या टेंडरची प्रतही कायदेशीर प्रक्रियेद्वारे प्राप्त करण्यात आल्याचे आपच्या वतीने सांगण्यात आले.
वैशिष्ट्यपूर्ण निधी २०२४-२५ तसेच दलितेतर निधी २०२४-२५ अंतर्गत नगरपरिषद क्षेत्रातील इतर शाळांचेही नूतनीकरण करण्यात आले आहे. यामध्ये शिवाजी प्राथमिक शाळा, वसंत प्राथमिक शाळा, स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा, मोतीलाल नेहरू प्राथमिक शाळा, लाला लजपत राय उच्च प्राथमिक शाळा आणि महाराणा प्रताप प्राथमिक शाळेचा समावेश आहे.
शासकीय शाळांचे नुतनीकरण करून विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणारे शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, नगरपरिषद प्रशासन तसेच या कामासाठी योगदान देणाऱ्या सर्व संबंधितांचे आम आदमी पार्टीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
शासकीय शाळांमध्ये आधुनिक सुविधा देण्याची मागणी
महाराष्ट्रातील सर्व शासकीय शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक दर्जा आणखी उंचावण्याची गरज असल्याचे आपच्या वतीने सांगण्यात आले. कॉन्व्हेंट शाळांच्या धर्तीवर शासकीय शाळांमध्ये आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धती आणि विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच सीबीएसई पॅटर्नप्रमाणे शिक्षणपद्धती विकसित करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आम आदमी पार्टीचे अॅड. दुर्गाप्रसाद मेहरे, अमर शेंडे, प्रकाश डोडानी, विजय गव्हाणे, ईश्वर गायकवाड, नितीन झाडे, चेतन कापसे आदी उपस्थित होते. भविष्यातही शासकीय शाळांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करण्याची भुमिका आम आदमी पार्टीने व्यक्त केली.

