मोपेडसह देशी-विदेशी दारू जप्त; २१ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल
विशेष प्रतिनिधी
सेलु
सेलु : सेलु पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाने नाकाबंदी करून देशी व विदेशी दारूसह मोपेड असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १६ सप्टेंबर रोजी वाहितपूर शिवारातील रस्त्यावर करण्यात आली.
पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना मुखबिराकडुन उज्वल सुरेश थुल (वय २१, रा. सुकळी स्टेशन, ता. सेलू) हा काळ्या रंगाच्या बर्गमॅन मोपेडमधुन दारू घेऊन वाहितपूरकडे जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वाहितपुर शिवारात नाकाबंदी करून वाहनाची तपासणी केली.
तपासणीदरम्यान मोपेडच्या डिक्कीतून ९० मिलीच्या देशी दारूच्या ८० सीलबंद बाटल्या, किंमत ८ हजार रुपये, तसेच मोपेडच्या पायदानावर प्लास्टिक पिशवीत Officer’s Choice विदेशी दारूच्या १८० मिलीच्या ४० सीलबंद बाटल्या, किंमत १२ हजार रुपये, असा एकुण २० हजार रुपयांचा दारूसाठा आढळुन आला. याशिवाय MH-32-AU-6569 क्रमांकाची सुझुकी बर्गमॅन मोपेड, किंमत ९५ हजार रुपये, असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी उज्वल थुल याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यासह मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली सेलु पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार पंकज वाघोडे यांच्या नेतृत्वात गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस अंमलदार अनिल केकतपुरे, रामकिसन इप्पर, विनायक गोडे व ओमप्रकाश तल्लारी यांनी केली.

