पैशांची अडचण अन् दारूच्या व्यसनाची पार्श्वभुमी; पवणार येथील २८ वर्षीय तरुणाचा मृत्यु
राजेश वरटकर
मुख्य संपादक
वर्धा
पवणार येथील धाम नदीच्या पुलावरून उडी घेऊन २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. मिथीलेश उर्फ गुड्डु लालसिंग ठाकुर असे मृत तरुणाचे नाव आहे. तो अविवाहित असुन धवळपेठ येथील अव्हाडा कंपनीत कामाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मिथीलेशला काही काळापासुन दारूचे व्यसन लागले होते. पगारातील पैसे दारूवर खर्च होत असल्याने त्याच्यावर आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपुर्वी तो उज्जैन येथे महाकाल दर्शनासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा मोबाईल हरवला होता. नवीन मोबाईल घेण्यासाठी तो वडिलांकडे मागणी करीत होता. त्याच्यासाठी आजच मोबाईल घेण्याचेही ठरले होते.
दरम्यान, गुरुवारी रात्री त्याने मद्यपान केले. त्यानंतर घरी असलेल्या गणपतीचे दर्शन घेऊन तो घराबाहेर पडला. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नाही. शुक्रवारी सकाळी धाम नदीच्या पुलावरून जाणाऱ्या नागरिकांना नदीच्या पाण्यात मृतदेह तरंगताना दिसुन आला. त्यांनी तत्काळ ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली.
मृतदेह पवणार येथील असल्याचे समोर आल्यानंतर ठाकुर कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. नातेवाईकांनी ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सेवाग्राम रुग्णालयात पाठविला. या प्रकरणाचा पुढील तपास सेवाग्राम पोलीस करीत आहेत.


