ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांमध्ये संताप
शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु.: नागपुर-वर्धा
मार्गावरील सेलडोह परिसरात रस्त्यावरील खड्डे डांबर किंवा सिमेंटच्या साहित्याऐवजी माती टाकून बुजविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या देखभालीचे काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराच्या या पद्धतीबाबत स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
नागपुर-वर्धा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडुन
टोलच्या माध्यमातुन शुल्क आकारले जाते. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करताना दर्जेदार साहित्याचा वापर केला जात नसल्याची तक्रार नागरिकांकडुन करण्यात येत आहे. सेलडोहजवळील खड्ड्यांमध्ये माती टाकून करण्यात आलेली डागडुजी पावसामुळे पुन्हा वाहुन जाण्याची शक्यता असल्याने ही दुरुस्ती कितपत टिकणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पावसामुळे माती रस्त्यावर
पसरल्यास रस्ता घसरडा होऊन दुचाकीस्वार तसेच इतर वाहनचालकांसाठी धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खड्यांवर केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
खड्डे बुजविण्यासाठी योग्य दर्जाचे डांबरी साहित्य किंवा आवश्यकतेनुसार सिमेंट काँक्रिटचा वापर करून रस्ता सुरक्षित करावा, तसेच देखभाल कामाच्या गुणवत्तेची
संबंधित विभागाने तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. टोल आकारला जात असताना रस्त्यांच्या देखभालीचा दर्जा समाधानकारक का नाही, असा सवालही वाहनचालकांकडुन उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाने या प्रकाराची दखल घेऊन संबंधित कंत्राटदाराकडुन करण्यात आलेल्या दुरुस्तीची पाहणी करावी आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या प्रकरणी संबंधित कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरणाकडून काय पावले
उचलली जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

