शिक्षणातील अडचणी सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन; विविध समस्यांवर विद्यार्थ्यांनी मांडल्या व्यथा
राजेश वरटकर
‘काकरोच जनता पार्टी’चे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी वर्धा शहरातील म्हाडा कॉलनी परिसरातील हनुमान मंदिराच्या पटांगणात विद्यार्थी व विद्यार्थिनींशी संवाद साधुन त्यांच्या शिक्षणाशी संबंधित समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा संवाद आयोजित करण्यात आला होता.
यावेळी विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालय तसेच शिक्षण व्यवस्थेशी संबंधित विविध अडचणी मांडल्या. सिंदी मेघे येथील एका नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्याने नवोदय प्रवेश परीक्षेतील पेपरफुटीबाबत चिंता व्यक्त करत अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या बिहारमधील एका विद्यार्थ्याने प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर सहा विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप यावेळी केला. तसेच नागपुर विभागातील आश्रमशाळेत अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या एका महिलेने शाळेतील सुविधांबाबत तक्रार केल्यानंतर आपल्याला नोकरीवरून काढण्यात आल्याचे सांगितले.
या संवादादरम्यान नागरिकांनीही विविध प्रश्न मांडत शासनाच्या धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या समस्या संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी संवादाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नितेश कराळे, नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी उपसभापती स.उपसभापती संदीप किटे, सेलु येथील विद्यार्थी नेते रोशन वांदिले, नवीन कुमार पाटील मुस्लिम समाजाच्या नेत्या सादिया अख्तर यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


