आनंद छाजेड़
विशेष प्रतिनिधी
सिंदी रेल्वे ता.१८ : शहरातील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जलशुद्धीकरण केंद्राची व्यवस्था असतानाही अनेक भागांत गाळयुक्त व अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांकडुन होत आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र नेमके कशासाठी, असा सवाल नागरिकांकडुन उपस्थित केला जात आहे.
शहरात नळाद्वारे येणाऱ्या पाण्यात गाळ, माती तसेच इतर अशुद्ध घटक आढळत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त काळजी घ्यावी लागत आहे. काही नागरिकांना पाणी गाळुन अथवा उकळून वापरावे लागत असल्याचे सांगण्यात येते. पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
जलशुद्धीकरण केंद्रातुन पाणी शुद्ध केल्यानंतरही नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यात गाळ मिसळत असेल, तर जलवाहिन्यांची स्थिती, गळती, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता आणि वितरण व्यवस्थेची तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र, वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया झाल्यानंतरही नळातून गाळयुक्त पाणी येत असेल, तर याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा थेट प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने पाण्याची गुणवत्ता तपासून अहवाल जाहीर करावा, जलवाहिन्या व पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करावी आणि नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी होत आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासनाने केवळ तात्पुरती उपाययोजना न करता समस्येच्या मुळाशी जाऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.

