खासदार अमर काळे यांची ग्वाही; मानधनवाढ, सामाजिक सुरक्षा, विमा व निवृत्तीविषयक तरतुदींसाठी पाठपुरावा
शिवशाही न्युज नेटवर्क
वर्धा
वर्धा, दि. २२ : अंगणवाडी सेविका-मदतनीस, आशा वर्कर, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी, बचत गटांच्या आयसीआरपी तसेच आरोग्य क्षेत्रात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लोकसभेत आवाज उठवून शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही खासदार अमर काळे यांनी दिली.
महिला कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यात या महिला कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भुमिका असुन, त्यांच्या कष्टांना योग्य मोबदला, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळणे आवश्यक असल्याचे काळे यांनी सांगितले.
‘तुमचा आवाज माझ्यापर्यंत आला आहे; आता हा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी माझी आहे,’ असे सांगत काळे यांनी महिला कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनातील प्रत्येक मागणी गांभीर्याने घेऊन संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
मानधनवाढ, कामाच्या स्वरूपानुसार योग्य मोबदला, सामाजिक सुरक्षा, विमा, निवृत्तीविषयक तरतुदी, कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा तसेच सेवाकालातील इतर प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र शासनाच्या अखत्यारितील मागण्या केंद्राकडे, तर राज्य शासनाच्या अखत्यारितील मागण्या राज्य शासनाकडे मांडल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
‘केवळ आश्वासन नाही, कार्यवाहीचा पाठपुरावा’
निवेदन स्वीकारून विषय संपविण्याऐवजी त्यावर प्रत्यक्ष काय कार्यवाही झाली, याचीही माहिती घेतली जाईल. गरज पडल्यास संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन प्रश्न मांडण्यात येतील, असे काळे यांनी सांगितले. महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर व्यापक आंदोलन उभे करण्यासाठी देशातील इतर खासदारांनाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी नमुद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांची निवेदने खासदार अमर काळे यांच्याकडे सादर केली. या मागण्यांचा संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून त्यावरील कार्यवाहीची माहिती घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

