उत्तर प्रदेशात नेऊन लैंगिक अत्याचार; बेलतरोडी पोलिसांनी केली पीडितेची सुटका
शिवशाही न्युज नेटवर्क
नागपुर
नागपुर : ऑनलाइन गेमच्या माध्यमातुन अल्पवयीन मुलीशी संपर्क वाढवुन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आरोपी सूरजकुमार राजपुत याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने ‘फ्री फायर’ या ऑनलाइन गेमच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीशी संपर्क साधला. त्यानंतर दोघांमध्ये ओळख वाढली. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने मुलीला फसवुन उत्तर प्रदेशात नेल्याचा आरोप आहे. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
दरम्यान, मुलगी घरी न आल्याने कुटुंबीयांनी बेलतरोडी पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून तांत्रिक माहितीच्या आधारे तिचा शोध घेण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान मुलगी उत्तर प्रदेशातील सीतापुर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बेलतरोडी पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले. पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिची सुखरूप सुटका केली आणि तिला नागपुरात आणले.
या प्रकरणातील आरोपी सूरजकुमार राजपुत याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास बेलतरोडी पोलिसांकडुन सुरू आहे.
ऑनलाइन मैत्रीबाबत पालकांनी सतर्क राहण्याची गरज
या घटनेमुळे अल्पवयीन मुलांचे ऑनलाइन गेमिंग, सोशल मीडिया आणि अनोळखी व्यक्तींशी होणारे संपर्क याबाबत पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. ऑनलाइन ओळखीतुन मुलांना फसवणुक किंवा गैरप्रकारांना सामोरे जावे लागु नये, यासाठी पालकांनी मुलांशी संवाद ठेवणे आणि त्यांच्या ऑनलाइन वापराबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.

