आठ दिवस मृत्युशी लढला… दहावीच्या विद्यार्थ्याचा अखेरचा श्वास; श्री क्षेत्र घोराडमध्ये शोककळा
राजेश वरटकर
मुख्य संपादक
शिवशाही न्युज
घोराड : हातात पुस्तकं घेऊन भविष्याची स्वप्नं पाहण्याच्या वयात नियतीने अरमान इसुब शाह या अवघ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याला हिरावुन नेले. यशवंत विद्यालय, घोराड येथे इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अरमानची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर बुधवारी सायंकाळी संपली. नागपुर येथील जामठा परिसरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. अरमानच्या निधनाने श्रीक्षेत्र घोराड परिसरावर दुःखाची छाया पसरली आहे.
गळ्यातील कर्करोगाने त्रस्त असलेल्या अरमानवर सुरुवातीला सावंगी येथे उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्याला नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटमध्ये दाखल करण्यात आले. गेल्या आठ दिवसांपासुन रुग्णालयातील खाटेवर जीवन-मृत्युशी त्याची झुंज सुरू होती. कुटुंबीयांच्या आशा आणि प्रार्थना त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सुरू होत्या. मात्र बुधवारी सायंकाळी नियतीसमोर ही झुंज अपुरी पडली.
‘अरमान’ नावाचे स्वप्न अधुरेच राहिले…
दहावीचे वर्ष… डोळ्यांसमोर पुढील आयुष्याची स्वप्ने…
शिक्षण पुर्ण करून काहीतरी करण्याची उमेद; मात्र काळाने त्याला संधीच दिली नाही. अभ्यासू, शांत आणि मनमिळावु स्वभावाचा अरमान आपल्या मित्र-मैत्रिणी आणि शिक्षकांमध्ये परिचित होता. त्याच्या अचानक जाण्याने यशवंत विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
परिस्थितीशी झुंज देणाऱ्या कुटुंबावर दुहेरी आघात
अरमानचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. त्याचे वडील शेळ्या राखुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. प्रतिकूल परिस्थितीतही अरमान शिक्षण घेत होता. मुलाने शिकुन पुढे जावे, अशी कुटुंबाची स्वप्ने होती. मात्र कर्करोगाने त्या स्वप्नांनाच काळाच्या पडद्याआड नेले. मुलाच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे.
घोराडच्या आठवणीत राहील अरमान…
श्रीक्षेत्र घोराड येथील संत केजाजी महाराज मंदिर परिसरात अरमानचे कुटुंब वास्तव्यास होते. त्याच्या निधनाची बातमी समजताच परिसरातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि शाळेतील शिक्षक-विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. कालपर्यंत शाळेच्या परिसरात तसेच मंदिर परिसरात मित्रांसोबत दिसणारा अरमान आज केवळ आठवण बनल्याने अनेकांचे डोळे पाणावले.
अवघ्या १५ वर्षांच्या आयुष्यात अरमानचा प्रवास थांबला; मात्र त्याच्या आठवणी घोराडच्या मातीशी आणि त्याच्या मित्रांच्या मनाशी कायमच्या जोडल्या गेल्या. त्याच्यावर गुरुवारी मुस्लिम समाजाच्या परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


