रेल्वे स्थानकातुन ऑटोने नेल्याचा दावा; पाच अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
शिवशाही न्युज नेटवर्क
वर्धा
वर्धा : वर्धा रेल्वे स्थानक परिसरातुन एका १९ वर्षीय तरुणीला ऑटोमधुन शहरातील विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. या धक्कादायक प्रकरणी वर्धा रेल्वे पोलिसांनी पाच अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७०(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दि.२३ सप्टेंबर रोजी नागपुर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील ही तरुणी चंद्रपुरला जाण्यासाठी घरातुन निघाली होती. चंद्रपुरहुन रेल्वेने ती सेवाग्राम येथे आली. त्यानंतर ऑटोने वर्धा रेल्वे स्थानक गाठले.
तक्रारीनुसार, २४ सप्टेंबरच्या पहाटे स्थानक परिसरात काही अज्ञात व्यक्ती तिच्या संपर्कात आल्या. मदतीच्या बहाण्याने तिला ऑटोमध्ये बसवुन शहरातील विविध ठिकाणी नेण्यात आल्याचा आरोप आहे. याचदरम्यान तिच्यावर जबरी लैंगिक अत्याचार झाल्याचे तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे. घटनेबाबत कोणाला सांगु नये, अशी धमकीही देण्यात आल्याचा दावा तिने केला आहे.
बसस्थानक परिसरात सोडले
घटनेनंतर तरुणीला वर्धा बसस्थानक परिसरात सोडण्यात आल्याचे तक्रारीत नमुद आहे. त्यानंतर तिने वर्धा रेल्वे पोलिसांकडे धाव घेत संपुर्ण प्रकाराची माहिती दिली.
पाच आरोपी अद्याप अज्ञात
या प्रकरणी २५ सप्टेंबर रोजी रात्री १२.४८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असुन FIR क्रमांक ०२७५/२०२६ असल्याचे उपलब्ध माहितीत नमुद आहे. पाचही आरोपी अद्याप अज्ञात असुन त्यांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ऑटोचा मागोवा, तांत्रिक माहिती आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.
पोलिस तपासातुन या प्रकरणातील नेमके सत्य समोर येणार असुन, आरोपींची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

