पहाटे हृदयविकाराचा तीव्र झटका; संत केजाजी महाराजांचे निस्सीम भक्त, अखंड वीणेचे होते प्रमुख
राजेश वरटकर
मुख्य संपादक
श्रीक्षेत्र घोराड येथील श्री संत केजाजी महाराज मंदिराचे पुजारी तथा निस्सीम भक्त बाळु डुकरे यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने श्रीक्षेत्र घोराड परिसरावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. अवघ्या एका दिवसापुर्वी १५ वर्षीय अरमान इसुब शाहच्या निधनाने गावावर दुःखाचे सावट असतानाच बाळु डुकरे यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
बाळु डुकरे हे श्री संत केजाजी महाराजांचे निस्सीम भक्त म्हणुन परिचित होते. श्री संत केजाजी महाराज मंदिरातील धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. नवरात्रोत्सवात जगदंबा माता मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांमध्येही ते पुढाकार घेत असत. सेलू-घोराड मार्गावरील मातामाय आई मंदिरात ते दररोज सकाळ-संध्याकाळ पुजा व आरती करीत होते.
श्री संत केजाजी महाराज मंदिरात अधिक मास तसेच श्रावण महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या अखंड वीणेचे ते प्रमुख होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड वीणा, टाळ वादन आणि विविध धार्मिक उपक्रम नियमितपणे पार पडत होते. मंदिरातील धार्मिक परंपरा जपण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
गुरुवारी नेहमीप्रमाणे मंदिरातील पुजा-अर्चा करून ते गावातील एका तेरवीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यानंतर रात्री कुटुंबीयांसोबत जेवण करून ते झोपी गेले. पहाटे सुमारे तीन वाजता छातीत जळजळ होत असल्याची माहिती त्यांनी पत्नी व मुलांना दिली. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना सेलू ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. आज दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निधनाची वार्ता समजताच सोनिया नगर येथील त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी मोठी गर्दी केली. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सदैव पुढे असलेल्या बाळु डुकरे यांच्या अचानक जाण्याने घोराड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
एकामागुन एक दुःखद घटना
अवघ्या एका दिवसापुर्वी घोराड येथील १५ वर्षीय अरमान इसुब शाह याचा कर्करोगाशी झुंज देताना मृत्यु झाला. त्या दुःखातुन गावकरी सावरत असतानाच बाळु डुकरे यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समोर आल्याने श्री क्षेत्र घोराडवर सलग दुसऱ्या दिवशी दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

