अल्पभुधारक शेतकरी कुटुंबातील संगीता झाडेची संघर्षावर मात; नागपुर वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पुर्ण
राजेश वरटकर
मुख्य संपादक
सिंदी रेल्वे,
शेतीच्या उत्पन्नावर कुटुंबाचा गाडा चालविताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या अल्पभुधारक शेतकऱ्याच्या कन्येने आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर वैद्यकीय क्षेत्रात यशाची भरारी घेतली आहे. सखाराम झाडे यांची कन्या संगीता सखाराम झाडे हिने नागपुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातुन एमबीबीएसचे शिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केले आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातुन आलेल्या संगीतासमोर वैद्यकीय शिक्षणाचा प्रवास सोपा नव्हता. आर्थिक अडचणी, मर्यादित साधने आणि शिक्षणाचा वाढता खर्च अशी आव्हाने असतानाही तिने आपल्या ध्येयापासुन कधीही माघार घेतली नाही. आई-वडिलांचे पाठबळ, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले.
नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत असताना संगीताने अभ्यासात सातत्य राखत एमबीबीएसची पदवी पुर्ण केली. तिच्या या यशाने आई-वडिलांसह झाडे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
‘परिस्थिती नव्हे, जिद्द महत्त्वाची’
संगीताचे यश ग्रामीण व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे. आर्थिक परिस्थिती प्रतिकुल असली तरी मनात ध्येय आणि ते पूर्ण करण्याची जिद्द असेल तर अडचणींवर मात करता येते, हे तिने आपल्या यशातुन दाखवून दिले आहे.
एमबीबीएस पुर्ण केल्याबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक तसेच सिंदी रेल्वे परिसरातील नागरिकांकडुन संगीताचे अभिनंदन होत आहे. वैद्यकीय क्षेत्रात पुढील वाटचाल करताना सर्वसामान्य व गरजु रुग्णांची सेवा करण्यासाठी तिने आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा, तसेच आपल्या आई-वडिलांचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
शेतकऱ्याच्या घरातुन निघालेली एक लेक आज डॉक्टर झाली; तिच्या यशाने ‘स्वप्न मोठे असेल तर परिस्थिती छोटी पडते’ हा विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे.

