उत्कृष्ट शिक्षक माणिकराव जागोबाजी देवतारे यांचे निधन; १५ वर्षांच्या सेवेत असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिली दिशा
शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु : विजयगोपाल जिल्हा परिषद शाळेत तब्बल १५ वर्षे विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि जीवनमुल्यांची शिदोरी देणारे ज्येष्ठ शिक्षक माणिकराव जागोबाजी देवतारे (९५)यांचे शनिवारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रासह सेलु परिसरावर शोककळा पसरली आहे.
शिक्षक म्हणुन प्रदीर्घ सेवाकाळात माणिकराव देवतारे यांनी केवळ अभ्यासक्रम शिकवला नाही, तर विद्यार्थ्यांना शिस्त, संस्कार, आत्मविश्वास आणि चांगला माणूस होण्याची शिकवण दिली. त्यांच्या साध्या, मनमिळावु आणि आपुलकीच्या स्वभावामुळे विद्यार्थी, पालक तसेच सहकाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष जिव्हाळा होता.
१५ वर्षांच्या शैक्षणिक सेवेत त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. मात्र, आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी दिलेले ज्ञान आणि माणुसकीची शिकवण हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख ठरणार आहे.
माणिकराव देवतारे यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुन-जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते सतीश देवतारे यांचे वडील होते.
उद्या होणार अंत्यसंस्कार
माणिकराव देवतारे यांच्या पार्थिवावर रविवार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता सेलु येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
“शिक्षक म्हणुन त्यांनी पेटवलेला ज्ञानाचा दिवा अनेकांच्या आयुष्यात प्रकाश देत राहील,” अशा भावना माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक व परिसरातील नागरिकांकडुन व्यक्त होत आहेत.

