विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचा एल्गार; शिवाजी चौकातुन मोर्चाला सुरुवात
राजेश वरटकर
मुख्य संपादक
वर्धा : नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटना (SBKS) यांच्या वतीने आज, २८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता शिवाजी चौक, वर्धा येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे.
बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणारे शैक्षणिक अर्थसहाय्य, गंभीर आजारासाठीचे अर्थसहाय्य, कामगार व मुलीच्या विवाहासाठीचे अनुदान तसेच पत्नीच्या प्रसूतीसाठी मिळणाऱ्या अनुदानाबाबत संघटनेने प्रश्न उपस्थित केले आहेत. नोंदणी, नूतनीकरण आणि विविध योजनांचे अर्ज मोठ्या कालावधीपासून प्रलंबित असल्याने कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
प्रमुख मागण्या
१३ जुलै २०२६ रोजीचा शासन निर्णय रद्द करून बंद केलेल्या शैक्षणिक योजना पूर्ववत सुरू कराव्यात.
नोंदणीसाठी रजिस्टर्ड ठेकेदाराचे प्रमाणपत्र मागण्याची अट शिथिल करून पात्र कामगारांना नोंदणी व प्रमाणपत्र तातडीने द्यावे.
वर्धा येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात पूर्णवेळ सरकारी कामगार अधिकारी उपलब्ध करून द्यावा.
प्रलंबित नोंदणी, नूतनीकरण व विविध अनुदानाचे अर्ज तातडीने निकाली काढावेत.
गंभीर आजारासाठीचे अर्थसहाय्य पुन्हा सुरू करावे.
कामगाराच्या मृत्यूनंतरच्या अर्थसहाय्याबाबतची नूतनीकरणाची अट शिथिल करावी.
कामगार व मुलीच्या विवाहासाठीचे तसेच पत्नीच्या प्रसूतीचे अनुदान पूर्ववत सुरू करावे.
योजनांचा लाभ वस्तू स्वरूपात देण्याऐवजी रक्कम थेट डीबीटीद्वारे बँक खात्यात जमा करावी.
नोंदणी व नूतनीकरण अर्ज निकाली काढण्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवून सेवा हमी कायदा लागू करावा.
बांधकाम कामगारांसाठी स्वतंत्र जिल्हा कार्यालय व अधिकारी-कर्मचारी व्यवस्था करावी.
नोंदणीकृत कामगारांच्या पाल्यांसाठी क्रीडा प्रोत्साहन योजना सुरू करावी.
ऑनलाइन प्रणालीच्या नावाखाली कामगारांना होणारा त्रास कमी करून सुलभ सेवा उपलब्ध करून द्यावी.
संघटनेचे अध्यक्ष उमेश अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या मोर्चात महिला-पुरुषांसह मोठ्या संख्येने बांधकाम कामगार सहभागी व्हावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

