सात जणांना अन्नविषबाधा; चिवड्यात पाल आढळल्याचा आरोप, उपजिल्हा रुग्णालयात उपचार
शिवशाही न्युज नेटवर्क
वरोरा जि.चंद्रपुर
वरोरा : शहरातील बस स्टॉप रोड परिसरातील एका चिवडा सेंटरमधुन खरेदी केलेला चिवडा खाल्ल्यानंतर सात जणांची प्रकृती बिघडल्याची घटना समोर आली आहे. चिवड्यात पाल आढळल्याचा आरोप बाधितांनी केल्याने वरोरा शहरात खळबळ उडाली आहे. सर्व बाधितांना तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
बस स्टॉप रोडवरील आयटीआयलगत असलेल्या मनोज चिवडा सेंटरमधुन चिवडा खरेदी केल्यानंतर काही जणांना त्रास जाणवु लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाधितांमध्ये सुवर्णा प्रवीण कोहळे (४५), प्रवीण शालीकराम कोहळे (५०), पंकज दिगंबर आवारी (४०), दिगंबर विठ्ठलजी आवारी, अफजल रफीक अहमदखान, शेख रेहमान आणि आयुब सागीर खान यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
पाल आढळल्याच्या आरोपाने खळबळ
चिवड्यात पाल आढळल्याचा आरोप झाल्याने खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाने तातडीने चौकशी करून चिवड्याचे नमुने तपासावेत, अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे.
अन्नविषबाधेचे नेमके कारण काय, चिवड्यात पाल आढळल्याचा आरोप तथ्यात्मक आहे का आणि संबंधित खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छतेच्या नियमांचे पालन झाले होते का, याबाबत प्रशासनाच्या तपासणीनंतरच स्पष्टता येणार आहे.
दरम्यान, रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.

