अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; १७ वर्षीय युवती गंभीर जखमी, अपघातानंतर चालक पसार
शिवशाही न्युज नेटवर्क
नागपुर/कळमेश्वर :
नागपुर-काटोल मार्गावरील फेटरी शिवारात माहुरझरीजवळ सोमवारी (२८ सप्टेंबर) दुपारी भीषण अपघात झाला. भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर १७ वर्षीय युवती गंभीर जखमी झाली. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह पसार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातात वेद विनय बोबडे (१८, रा. वीरचक्र कॉलनी, काटोल रोड, नागपुर) आणि अर्थव अजय कवर (१८, रा. सदर, नागपुर) यांचा मृत्यू झाला. तर जखमी युवतीचे नाव रुहाना बेस्टियन (१७, रा. मेकोसाबाग, नागपूर) असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, वेद, अर्थव आणि रुहाना हे टीव्हीएस ज्युपिटर एमएच-३१/एफजी-१५०५ या दुचाकीने फेटरी गोडाऊनमार्गे माहुरझरीकडे जात होते. वळणावर अचानक मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे तिघेही रस्त्यालगतच्या खोल भागात फेकले गेले. या भीषण धडकेत वेद आणि अर्थव यांचा जागीच मृत्यु झाला, तर रुहाना गंभीर जखमी झाली.
अपघातानंतर कळमेश्वरचे ठाणेदार प्रमोद काळंबांडे आणि पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी रुहानाला प्राथमिक उपचारानंतर नागपुर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे. अपघात नेमका कसा झाला आणि वाहनचालक कोण होता, याचा तपास सुरू आहे. या अपघातामुळे मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

