दोन महिलांची सुटका; दोन महिला दलाल अटकेत, २२ हजारांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर : शहरातील अष्टभुजा वॉर्ड परिसरात राहत्या घरातून सुरू असल्याचा आरोप असलेल्या वेश्याव्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. पोलिसांनी धाड टाकून दोन महिलांची सुटका केली, तर दोन महिला दलालांना अटक केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दि. १ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अष्टभुजा वॉर्डातील एका घरावर पाळत ठेवली. माहितीची खात्री करण्यासाठी बनावट ग्राहक पाठविण्यात आला. व्यवहाराची खात्री होताच पोलिसांनी पंच व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घरावर अचानक धाड टाकली.
या कारवाईत मुस्कान शफीक शेख (४०) आणि रेशमा उर्फ तैबुल फतिमा अब्दुल रफीक शेख (४५) या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, दोघी संगनमताने महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे तपासात समोर आले.
कारवाईदरम्यान मोबाईल, रोख रक्कम व इतर साहित्य असा २२ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच या प्रकरणात अडकलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ मधील कलम ३, ४, ५ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

