चार लेकींच्या भविष्याची स्वप्ने अधुरी; भीषण अपघाताने कुरसंगे कुटुंबाचा आधार हरपला
वर्धा जिल्ह्यात हळहळ
राजेश वरटकर
मुख्य संपादक
वर्धा : लेकींच्या लग्नाची स्वप्ने उराशी बाळगुन, त्यांच्या सुखी संसारासाठी आयुष्यभर घाम गाळणाऱ्या एका बापाचा दुर्दैवी अंत झाला. दुर्गादेवीची मुर्ती आणण्यासाठी आनंदाने गेलेला दत्ता कुरसंगे (६०) यांचा परतीच्या प्रवासात झालेल्या भीषण अपघातात मृत्यु झाला. कालच्या या हृदयद्रावक घटनेने कुरसंगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असुन, परिसरात शोककळा पसरली आहे.
सोमनाथे ले-आउट येथील दत्ता कुरसंगे हे भाजी मंडईत हमाली आणि मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही त्यांनी पत्नी आणि चार मुलींच्या सुखासाठी स्वतःचे आयुष्य झिजवले. दिवसभर कष्ट करून मिळणाऱ्या पैशातुन त्यांनी मोठ्या मुलीचे लग्न थाटात केले. मात्र, उर्वरित तीन मुलींच्या लग्नाची जबाबदारी अजुनही त्यांच्या खांद्यावर होती.
लेकींच्या लग्नाची स्वप्ने मनातच राहिली!
आपल्या तिन्ही लेकींचे हात पिवळे करून त्यांना सन्मानाने सासरी पाठवायचे, हेच दत्ता यांचे स्वप्न होते. त्यासाठी ते दिवस-रात्र मेहनत करीत होते. मात्र, काळाच्या एका घावाने त्यांच्या कुटुंबाचे संपुर्ण आयुष्यच बदलुन गेले. ज्या हातांनी मुलींचे भविष्य घडविण्यासाठी आयुष्यभर कष्ट केले, ते हात कायमचे थंडावले. आता या तीन लेकींच्या डोक्यावरचा बापाचा मायेचा हात हरपला आहे.
देवीच्या मुर्तीसाठी निघाले, पण परतलेच नाहीत!
२८ सप्टेंबर रोजी दत्ता कुरसंगे मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत दुर्गादेवीची मुर्ती आणण्यासाठी शेगावला गेले होते. देवीचे आगमन उत्साहात व्हावे, या भक्तिभावाने निघालेला त्यांचा प्रवास अखेरचा ठरेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. परतीच्या प्रवासात धामणगाव परिसरात झालेल्या भीषण अपघाताने त्यांच्या आयुष्याचा प्रवासच संपवला.
घरातील कर्ता पुरुष गेल्याने पत्नीसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. तीन मुलींच्या भविष्याची चिंता आणि कुटुंबाच्या उद्याची अनिश्चितता या विचारांनी नातेवाइकांसह परिसरातील नागरिकही व्यथित झाले आहेत.
एका अपघाताने केवळ एक जीव हिरावला नाही, तर तीन लेकींच्या भविष्याचा आधार आणि एका कुटुंबाच्या आशेचा किरणही हिरावुन घेतला. आयुष्यभर कष्ट करून कुटुंबासाठी जगणाऱ्या या बापाचा दुर्दैवी अंत प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रु आणणारा ठरला आहे.

