आनंदाचा प्रवास ठरला अखेरचा; समृद्धी महामार्गावरील भिषण अपघाताने वर्धा हादरले
राजेश वरटकर
मुख्य संपादक
वर्धा : दुर्गादेवीची मुर्ती घेऊन आनंदाने वर्ध्याकडे परतणाऱ्या भाविकांच्या प्रवासावर समृद्धी महामार्गावर काळाने घाला घातला. धामणगाव रेल्वेजवळील चॅनल क्रमांक ९७ परिसरात ट्रक आणि बोलेरो पिकअपची भीषण धडक झाली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यु, तर अनेक जण जखमी झाले. या घटनेने सिंदी मेघे परिसरासह संपुर्ण वर्धा जिल्ह्यावर शोककळा पसरली.
देवीच्या आगमनाचा आनंद घेऊन घरी परतणाऱ्या कुटुंबांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. काही घरातील कर्ते पुरुष काळाच्या पडद्याआड गेले, तर २० ते २५ वयोगटातील तरुणांचाही या दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला. त्यामुळे अनेक कुटुंबांचा आधारच हिरावला गेला.
या अपघातात दत्ता कुरसंगे, प्रवीण बकाने, घनश्याम पाटील, सचिन बादलमवार, ओम गावंडे, मुनेश्वर ढोले आणि रोशन राऊत यांचा मृत्यू झाला. त्यापैकी दत्ता कुरसंगे आणि प्रवीण बकाने हे भाजी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबांवर आर्थिक संकटही ओढवले आहे.
जखमींच्या वेदनेवर खासदार अमर काळेंची धाव
अपघातातील जखमी दिनेश पोहनकर, नरेंद्र सयाम, सतीश राऊत, अनिल मसराम, दिनेश नानवटे, यश मलकापुरे आणि सागर ढोले यांच्यावर सावंगी (मेघे) येथे उपचार सुरू आहेत. खासदार अमर काळे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली, डॉक्टरांकडुन उपचारांची माहिती घेतली आणि आवश्यक उपचार तत्परतेने मिळावेत, अशा सुचना केल्या.
त्यानंतर खासदार काळे यांनी मृतांच्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन सांत्वन केले. तसेच जखमी सतीश खाडे, नयन खानझोडे आणि अमित आडे यांच्या घरीही भेट देऊन प्रकृतीची विचारपुस केली.
‘चौकशी होईल; आधी कुटुंबांना आधार द्या’
या भीषण दुर्घटनेनंतर समृद्धी महामार्गावरील वाहन वाहतुक आणि सुरक्षेच्या नियमांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुर्ती वाहुन नेणाऱ्या वाहनाची रचना, प्रवाशांची संख्या, वाहनाची क्षमता, जोडलेली ट्रॉली, रात्रीचा प्रवास आणि सुरक्षा नियम यांची आवश्यक तपासणी झाली होती का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘परवानगी दिली असेल तर ती कोणी दिली आणि नियमांचे पालन झाले होते का?’ याची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी खासदार अमर काळे यांनी केली आहे. मात्र चौकशीसोबतच मृतांच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत आणि गंभीर जखमींच्या उपचारांचा आवश्यक खर्च शासनाने उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
देवीच्या आगमनासाठी निघालेला आनंदाचा प्रवास सात कुटुंबांसाठी आयुष्यभराची वेदना ठरला. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना आधार देणे आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करणे, हेच आता सर्वांसमोरील मोठे आव्हान आहे.


