डॉक्टर होण्याचे स्वप्न डोळ्यांत; प्रवेशासाठी ६ लाखांची गरज, आई-वडिलांची पैशांसाठी धडपड
नांदेड : विशेष प्रतिनिधी
घरात अठराविश्व दारिद्र्य… वडील आठवडी बाजारात भाजीपाला विकतात, आई दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर काम करते. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत खडकमांजरी येथील हरिओम वारकड याने NEET परीक्षेत ५१५ गुण मिळवत MBBS शिक्षणाची संधी मिळवली. पहिल्याच फेरीत परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालयात त्याचा प्रवेश निश्चित झाला; मात्र प्रवेशासाठी लागणारे सुमारे ६ लाख रुपये उभे करण्याचे मोठे आव्हान या कुटुंबासमोर उभे ठाकले आहे.
डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून हरिओमने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत NEETची तयारी केली. त्याच्या जिद्दीला बळ देत IIB कोचिंग क्लासेसचे प्रमुख दशरथ पाटील यांनी त्याला ११वी व १२वीचे शिक्षण मोफत दिले. या मदतीच्या जोरावर हरिओमने NEETमध्ये ५१५ गुण मिळवत वैद्यकीय प्रवेशाची संधी मिळवली.
फी जमविण्यासाठी वडिलांची बँकांच्या पायऱ्या
मुलाचे यश पाहुन आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला; मात्र आता प्रवेशाची फी कशी भरायची, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. हरिओमचे वडील माधव वारकड पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी विविध बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. वेळेत पैसे जमा झाले नाहीत तर मुलाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे राहण्याची भीती कुटुंबाला सतावत आहे.
MBBSची जागा मिळाली; भावी डॉक्टर शेतात मजुरीवर!
एकीकडे MBBS प्रवेशाची संधी मिळाली आहे, तर दुसरीकडे आर्थिक संकटाने या गुणवंत विद्यार्थ्याला शेतात मजुरी करण्याची वेळ आणली आहे. हरिओम सध्या आपल्या आईसोबत दुसऱ्याच्या शेतात सोयाबीन कापणीचे काम करीत आहे. मिळणाऱ्या मजुरीतुन शिक्षणासाठी लागणाऱ्या पुस्तकांपासुन इतर खर्चाची तरतुद करण्याची त्याची धडपड सुरू आहे.
गरिबीसमोर हार न मानता NEETमध्ये यश मिळविणाऱ्या या गुणवंत विद्यार्थ्याला आता समाजातील दानशुर व्यक्ती आणि संस्थांच्या मदतीची गरज आहे. एका होतकरू विद्यार्थ्याला मदतीचा हात मिळाला, तर त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होऊ शकते.

