विशेष प्रतिनिधी
चंद्रपुर
चंद्रपुर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यात वाघाच्या हल्ल्याची थरारक घटना घडली असुन, यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उषा अंकुश गुरुनुले (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे, पतीच्या डोळ्यांदेखत वाघाने पत्नीवर झडप घालुन तिला जंगलाच्या दिशेने ओढत नेले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रांतर्गत पळसगाव वनपरिक्षेत्रात जंगलालगतच्या शेतात घडली.
धानाला पाणी देण्यासाठी गेले अन् काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, उषा गुरुनुले या सोयाबीन कापणीचे काम आटोपल्यानंतर पती अंकुश गुरुनुले आणि गावातील एका सहकाऱ्यासोबत जंगलालगतच्या शेतात धान पिकाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. पती डिझेल इंजिन सुरू करण्यात व्यस्त असताना उषा या शेतातील तण काढत होत्या.
याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक उषा यांच्यावर झडप घातली. वाघाने त्यांच्या मानेचा चावा घेतला आणि त्यांना जंगलाच्या दिशेने ओढत नेले. पती आणि सहकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
वनविभाग आणि पोलिस घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तसेच चिमूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रालगत शेतात काम करणाऱ्या नागरिकांमध्ये या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन्यप्राण्यांपासुन शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
