वडिलांची थेट उच्च न्यायालयात धाव!वैद्यकीय पुराव्यातील विसंगती, सीसीटीव्ही फुटेजकडे दुर्लक्ष अन् कथित खोट्या पुरवणी जबाबाचा मुद्दा; CIDमार्फत स्वतंत्र तपासाची मागणी
शिवशाही न्युज नेटवर्क
नागपुर : वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यु झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी मृत्यू आत्महत्येच्या दिशेने नेल्याचा आरोप करत मुलीचे वडील प्रमोद देऊळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात धाव घेतली आहे.
याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, मृत मुलीच्या गळ्यावरील खुणा, मृत्युची परिस्थिती आणि उपलब्ध वैद्यकीय पुरावे यामध्ये विसंगती असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजकडे पुरेसे लक्ष देण्यात आले नसल्याचा, महत्त्वपुर्ण पुरावे संकलित न केल्याचा आणि तपासादरम्यान कथितरीत्या चुकीचा/खोटा पुरवणी जबाब नोंदविल्याचा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे.
मृत्युचे खरे कारण निष्पक्षपणे तपासा
या अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्युचा तपास आत्महत्येच्या दिशेने; पोलिसांच्या तपासावर गंभीर आक्षेप केवळ आत्महत्येचा निष्कर्ष न काढता उपलब्ध सर्व वैद्यकीय व इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची स्वतंत्रपणे तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तपासात त्रुटी राहिल्याचा आरोप असल्याने संपूर्ण प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (CID) स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल पद्धतीने करण्यात यावा, अशी मागणी उच्च न्यायालयासमोर करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयात सुनावणी
प्रमोद देऊळकर यांनी दाखल केलेल्या फौजदारी रिट याचिकेवर नागपुर खंडपीठात सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजु मांडताना तपासातील कथित त्रुटी, उपलब्ध पुराव्यांचे योग्य मूल्यमापन न झाल्याचे मुद्दे आणि निष्पक्ष तपासाची आवश्यकता न्यायालयाच्या निदर्शनास आणुन देण्यात आली.
या प्रकरणातील मृत्युचे नेमके कारण काय? तपासात खरोखरच त्रुटी राहिल्या आहेत का? आणि उपलब्ध सीसीटीव्ही व वैद्यकीय पुराव्यांचा योग्य तपास झाला आहे का? या प्रश्नांची उत्तरे स्वतंत्र तपासातुनच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
शिवशाही न्युज नेटवर्कचा ठाम सवाल
अल्पवयीन मुलीच्या मृत्युमागील सत्य समोर येणार तरी कधी?
निष्पक्ष तपासातुन सत्य उघड होण्याची प्रतीक्षा
