दिवसभरात ३ ते ५ वेळा वीज खंडित; नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त
शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु, जि. वर्धा
सेलु शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांसह व्यापारी व व्यावसायिक हैराण झाले आहेत. दिवसभरात तब्बल ३ ते ५ वेळा वीज ये-जा करत असून, अनेकदा एक ते दोन तास वीजपुरवठा बंद राहत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
वीजपुरवठ्याच्या या सततच्या लपंडावाचा सर्वाधिक फटका ऑनलाइन सेवा केंद्रे, संगणकावर आधारित व्यवसाय, दुकानदार आणि छोट्या व्यावसायिकांना बसत आहे. ग्राहक कामासाठी दुकानात आल्यानंतर वीज नसल्याने त्यांना ताटकळत बसावे लागते. बराच वेळ प्रतीक्षा करून काही ग्राहक वैतागुन परत जात असल्याने व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे.
विजपुरवठा वारंवार का खंडित होतो?
वीजपुरवठा वारंवार खंडित होण्यामागील नेमके तांत्रिक कारण काय आहे, याची संबंधित विभागाने चौकशी करणे गरजेचे आहे. देखभाल किंवा दुरुस्तीची कामे असल्यास त्याबाबत नागरिकांना पुर्वसुचना देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांमध्येही नाराजी वाढत आहे. रोजच्या कामकाजावर परिणाम होत असल्याने महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वीजपुरवठ्यातील वारंवार होणाऱ्या व्यत्ययावर कायमस्वरूपी तोडगा काढुन नागरिक व व्यावसायिकांना दिलासा देण्याची गरज आहे.
आता तरी महावितरण प्रशासन जागे होणार का? असा सवाल सेलुतील नागरिकांकडुन उपस्थित केला जात आहे.
