३८ एफडीधारकांना ३० लाख ५० हजार रुपये दिल्याची माहिती; खातेदारांमध्ये चिंता, सखोल चौकशीची मागणी
शिवशाही न्युज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : येथील सुमारे ३८ वर्षांपासुन कार्यरत असलेल्या समर्थ नागरिक पतसंस्थेतील २ कोटी २४ लाख रुपयांच्या कथित आर्थिक अनियमिततेप्रकरणी संस्थेचे लेखापरीक्षक मनोज जनार्दन बोदडे यांनी शुक्रवारी सिंदी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. तक्रार दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली असून, पतसंस्थेच्या खातेदारांमध्ये आपल्या ठेवींच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह?
समोर आलेल्या तक्रारीनुसार, पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये २ कोटी २४ लाख रुपयांची कथित आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर घवघवे हे सलग १८ वर्षांपासुन अध्यक्षपदावर असल्याने त्यांच्या कार्यकाळातील आर्थिक व्यवहारांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, या आरोपांची सत्यता आणि अनियमिततेचे नेमके स्वरूप पोलिस तपासातुनच स्पष्ट होणार आहे.
३८ एफडीधारकांना ३० लाख ५० हजार रुपये
दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार ३८ एफडीधारकांना एकुण ३० लाख ५० हजार रुपये देण्यात आल्याचे समोर आले आहे. ही रक्कम कोणत्या कालावधीत, कोणत्या कारणासाठी आणि कोणत्या पद्धतीने देण्यात आली, तसेच संबंधित व्यवहारांची संस्थेच्या लेखापुस्तकांमध्ये योग्य नोंद करण्यात आली होती का, याची तपासणी होणे आवश्यक आहे.
या व्यवहारांचा कथित २ कोटी २४ लाख रुपयांच्या आर्थिक अनियमिततेशी काही संबंध आहे का, याचाही तपास होणे गरजेचे आहे. एफडीधारकांना देण्यात आलेल्या रकमेचे धनादेश, पावत्या, खातेनोंदी आणि इतर संबंधित कागदपत्रांची चौकशी केल्यास या प्रकरणातील अनेक बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
कॅशियरच्या नियुक्तीसह अध्यक्ष व संचालक मंडळाच्या जबाबदारीची चर्चा
या प्रकरणाच्या पार्श्वभुमीवर पतसंस्थेतील कॅशियर महेंद्र बाहेकर यांच्या नियुक्तीबाबत, तसेच संस्थेतील आर्थिक व्यवहारांवरील नियंत्रण, अंतर्गत लेखापरीक्षण आणि अध्यक्ष व संचालक मंडळाच्या जबाबदारीबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
संस्थेच्या आर्थिक व्यवहारांवर नियमित देखरेख ठेवली जात होती का? व्यवहारांचे योग्य पद्धतीने परीक्षण झाले होते का? कथित अनियमितता असल्यास ती वेळीच निदर्शनास का आली नाही? अशा विविध प्रश्नांची उत्तरे आता तपासातुन मिळणे अपेक्षित आहे.
खातेदारांची पैसे काढण्यासाठी गर्दी
कथित आर्थिक अनियमिततेची माहिती समोर आल्यानंतर काही खातेदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असुन, पैसे काढण्यासाठी पतसंस्थेकडे गर्दी होत असल्याचे दिसुन येत आहे. मात्र, किती खातेदारांनी पैसे काढले, किती रकमेचे व्यवहार झाले आणि संस्थेची सध्याची आर्थिक स्थिती काय आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सामान्य नागरिक, व्यापारी आणि ठेवीदार आपल्या भविष्यातील गरजा, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च तसेच अन्य आर्थिक जबाबदाऱ्यांसाठी पतसंस्थेत ठेवी ठेवतात. त्यामुळे एवढ्या मोठ्या रकमेच्या कथित अनियमिततेची चर्चा सुरू झाल्याने खातेदारांमध्ये चिंता वाढली आहे.
संपुर्ण आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी
सिंदी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर आता पोलिसांच्या तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. कथित आर्थिक अनियमिततेची व्याप्ती किती आहे, २ कोटी २४ लाख रुपयांच्या रकमेचा नेमका तपशील काय आहे, ३८ एफडीधारकांना देण्यात आलेल्या ३० लाख ५० हजार रुपयांचा या प्रकरणाशी संबंध आहे का?, तसेच या व्यवहारांमध्ये आणखी कोणाची भुमिका आहे का, हे तपासातुन स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पतसंस्थेच्या संपुर्ण आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणावी, संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी आणि खातेदारांच्या ठेवी सुरक्षित असल्याबाबत संस्थेने अधिकृतपणे स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडुन केली जात आहे.
या प्रकरणासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष सुधाकर घवघवे यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांची बाजु उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

