शिवशाही न्युज नेटवर्क
हरियाणा : शेतकऱ्यांनी वेळेत योग्य पद्धतीने शेतीकडे लक्ष न दिल्यास आगामी काळात आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. २०४० पर्यंत देशातील सुमारे ३० टक्के लोकसंख्येला कर्करोग, रक्तदाब (बीपी) यांसारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागु शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
हरियाणा येथे आयोजित कृषक वैज्ञानिक संवाद कार्यक्रमात किसान एवं कल्याण विभागाचे महासंचालक अजित बालाजी जोशी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. देशातील लाखो नागरिकांच्या अन्नाची गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे. मात्र आता केवळ उत्पादन वाढविण्यापेक्षा गुणवत्तापुर्ण आणि आरोग्यदायी अन्नधान्याचे उत्पादन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचा संदर्भ देत त्यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. रासायनिक घटकांचा वाढता वापर, बदलते हवामान आणि दूषित पाणी यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांनी नमुद केले.
सीएसआयआरचे संचालक डॉ. पी.सी. शर्मा यांनी भुजल पातळी सातत्याने घटत असून, भूजल प्रदुषित होत असल्याची चिंता व्यक्त केली. कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे उत्पादनासोबतच मानवी जीवनचक्रावरही परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना नैसर्गिक शेतीच्या परंपरेशी पुन्हा जोडले जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी देशी पशुंच्या जातींचे संवर्धन करण्यावरही भर देण्यात आला. देशी पशुंची नोंदणी व संवर्धन केल्यास पशुपालन व्यवसायाला चालना मिळण्यासोबतच देशी पशुसंपदाही वाढण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी उत्पादनाबरोबरच अन्नाची गुणवत्ता, मातीचे आरोग्य, पाण्याचे संवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल याकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे, असा संदेश या कार्यक्रमातुन देण्यात आला.
