आरोपी ने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दिली हत्येची माहिती
सचिन मेश्राम
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपुर
चंद्रपुर शहरात प्रेमसंबंधातुन झालेल्या वादाचे अत्यंत धक्कादायक हत्याकांडात रूपांतर झाल्याची घटना समोर आली आहे. ४५ वर्षीय महिलेची गळा दाबुन हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह नागपुर जिल्ह्यातील हिंगणा परिसरात नेऊन पुरल्याचा आरोप असुन, या प्रकरणी चंद्रपुर शहर पोलिसांनी संतोष साखरकर (४९, रा. तुकुम, चंद्रपुर) याला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचे संबंधित महिलेसोबत मागील तीन ते चार वर्षांपासुन प्रेमसंबंध होते. १४ ऑक्टोबर रोजी दोघांमध्ये वाद झाला. या वादातुन आरोपीने महिलेचा गळा दाबुन हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह हिंगणा येथे नेऊन पुरण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आरोपी स्वतःच पोहोचला पोलीस ठाण्यात!
या घटनेला नाट्यमय वळण तेव्हा मिळाले, जेव्हा १७ ऑक्टोबर रोजी आरोपी स्वतः चंद्रपुर शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हिंगणा येथे जाऊन कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदारांच्या उपस्थितीत उत्खनन करून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपुर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चंद्रपुर शहर पोलीस करीत आहेत
शिवशाही न्युज नेटवर्क
निर्भीड • निष्पक्ष • सत्याच्या बाजुने
