वाघ-बिबट्याच्या दर्शनाने भाविकांमध्ये कुतुहल
शिवशाही न्युज नेटवर्क
वर्धा
सेलु : जंगलाच्या मध्यभागी वसलेल्या भोंडाई मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. भोंडाई माता ही चमत्कारी देवी असल्याची भाविकांची श्रद्धा असुन, नवरात्रोत्सवादरम्यान दरवर्षी वन्यप्राण्यांचे दर्शन होत असल्याचे सांगितले जाते. यंदाही ९ तारखेला वाघ, तर ११ तारखेला बिबट्या मंदिर परिसरात आल्याचे भाविकांनी सांगितले.
घट विसर्जनाच्या दिवशी सकाळी ५ वाजता नित्य आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर महिला भजन मंडळाच्या वतीने काल्याचे भजन करण्यात आले. यावेळी नवकन्या पुजन करून त्यांच्या ओट्या भरण्यात आल्या व त्यांना महाप्रसाद देण्यात आला.
दुपारी १२ वाजता आरती झाल्यानंतर भोंडाई मातेच्या घटाचे विधिवत विसर्जन करण्यात आले. यावेळी ढोल ताशा, गुलालाची उधळण, तसेच टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली. जंगलात मध्यभागी पाणी उपलब्ध असलेल्या बंधा-यात घट विसर्जन करण्यात आला,नंतर भाविकांसाठी महाप्रसादाच्या पंगती सुरू करण्यात आल्या. सेलु, घोराड तसेच नागपुर येथून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी सेलुच्या तहसीलदार शकुंतला पारोजे यांनी भोंडाई मातेचे दर्शन घेत पंगतीत बसुन महाप्रसादाचा लाभ घेतला. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाप्रसाद वितरणासाठी तालुक्यातील महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करून भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे वितरण केले.
भोंडाई मातेच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक येत असुन, यंदा वाघ आणि बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भाविकांमध्ये विशेष चर्चा होती. मात्र, वन्यप्राण्यांच्या उपस्थितीच्या पार्श्वभुमीवर भाविकांनी सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले.
महाप्रसादाचा कार्यक्रम रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार असुन, दसऱ्यानिमित्त घोराड येथील तरुणांच्या वतीने लंगरचे आयोजन करण्यात आले आहे. उद्याही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची माहिती भोंडाई माता मंदिराचे अध्यक्ष सुधीर चौधरी यांनी दिली.




