शिवशाही न्युज नेटवर्क
चंद्रपुर
चंद्रपुर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील भारपायली येथे विजयादशमीच्या पुर्वसंध्येला कौटुंबिक वादातुन पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत पतीने दोन वर्षांच्या मुलीला मारहाण केल्यानंतर त्याला विरोध करणाऱ्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी खलबत्त्याने प्रहार केल्याचा आरोप आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास अंकिता मयुर दंडीकवार या घरातील बेडरूममध्ये असताना त्यांना मुलीच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी किचनमध्ये जाऊन पाहिले असता त्यांचे पती मयूर शरद दंडीकवार हे दोन वर्षांच्या मुलीला मारहाण करत असल्याचे दिसले. मुलगी लहान असल्याने तिला का मारता, अशी विचारणा अंकिता यांनी केली.
यावेळी मयुर याने शिवीगाळ करत पत्नीला हाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर किचनमध्ये ठेवलेला लोखंडी खलबत्ता हातात घेऊन अंकिता यांच्या डोक्यात प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. तसेच पत्नी आणि मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमुद आहे.
दरम्यान, घरातील सासु व ननद घटनास्थळी आल्याने आरोपी तेथून निघुन गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर अंकिता यांनी वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि त्यांच्यासोबत सावली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून सावली पोलिसांनी २० ऑक्टोबर रोजी पहाटे १.२७ वाजता BNS कलम ११८(१), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अजय विजयराव वडलावार करीत आहेत.
