२३ व २४ ऑक्टोबरला ऐतिहासिक पर्वणी; भव्य शोभायात्रा, महाआरतीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
शिवशाही न्युज नेटवर्क
सिंदी रेल्वे, दि. २२ : श्री गजानन महाराजांच्या भक्तांसाठी आनंदाची आणि श्रद्धेची पर्वणी ठरणारा सोहळा सिंदी रेल्वे शहरात प्रथमच आयोजित करण्यात आला आहे. शहरातील बाजार चौक येथील श्री गणपती मंदिर देवस्थानात शुक्रवार, दि. २३ आणि शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी श्री सद्गुरू गजानन महाराजांच्या मूळ पादुकांच्या दर्शनाचा दुर्मीळ योग भाविकांना लाभणार आहे. या निमित्ताने दोन दिवसीय धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
ढोल-ताशांच्या गजरात पादुकांचे आगमन
शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता श्री पादुकांचे आगमन होणार आहे. बसस्थानकापासून श्री गणपती मंदिरापर्यंत स्वागत यात्रा काढण्यात येईल. सिंदी रेल्वे येथील शिवगर्जना ढोल पथकाच्या गजरात निघणाऱ्या या यात्रेमुळे महोत्सवाची सुरुवात होईल. सायंकाळी ६ वाजता हरिपाठ, तर ७.१५ वाजता नैवेद्य व महाआरती होणार आहे.
शनिवारी भव्य शोभायात्रा अन् महाआरती
शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी पहाटे काकडा व आरतीने धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होईल. सकाळी ६ वाजता पादुकांचा अभिषेक, तर ७ वाजता श्री पादुकांची नगर प्रदक्षिणा व शोभायात्रा काढण्यात येईल. सकाळी १०.४५ वाजता मंदिरात पादुका आगमन व महाआरती, तर ११ वाजता नैवेद्य महाआरती होईल. सायंकाळी हरिपाठ, महाआरती व पादुका प्रस्थानानंतर सायंकाळी ७.३० वाजेपासून महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
मान्यवरांचा सत्कार व अनुभूती कथन
या महोत्सवात श्री गजानन महाराज पादुका संस्थान, श्रीक्षेत्र मुंडगाव, जिल्हा अकोला येथील संस्थान पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता नागपूर येथील मा. श्री. जयंतजी बेलगावकर यांचे ‘श्री गजानन अनुभूती’ या विषयावर अनुभव कथन होणार आहे.
भाविकांसाठी भक्तीचा अविस्मरणीय सोहळा
सिंदी रेल्वे शहरात प्रथमच आयोजित या महोत्सवामुळे गजानन महाराजांच्या भक्तांना मूळ पादुकांच्या दर्शनाची संधी मिळणार आहे. या धार्मिक सोहळ्यात शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे
