चार तरुणींसह महिला ताब्यात
गोपनीय माहितीवरून लोहारा पोलिसांची धडक कारवाई; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
शिवशाही न्युज नेटवर्क यवतमाळ
लोहारा परिसरातील एका घरात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर लोहारा पोलिसांनी शनिवारी, दि. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते ४.३० वाजण्याच्या सुमारास धडक कारवाई केली. या कारवाईत चार तरुणींसह एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघापुर परिसरातील मैथिली नगर येथील एका निवासी घरात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकुन कारवाई केली.
ठाणेदार रोहित चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने ही कारवाई केली. प्राथमिक तपासात संबंधित महिला आपल्या राहत्या घरातून काही महिला व तरुणींना बळजबरीने तसेच आर्थिक प्रलोभन दाखवुन देहविक्रीच्या व्यवसायात प्रवृत्त करीत असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी चार तरुणींसह संबंधित महिलेला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या सर्वांना लोहारा पोलिस ठाण्यात आणण्यात आले असुन, त्यांची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असुन, पुढील तपास लोहारा पोलिसांकडुन करण्यात येत आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता आणि अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
