अंथरुणाला खिळलेल्या रुग्णाला आधुनिक रुग्ण पलंगाची भेट; शिवेश कावळे यांचा संवेदनशील पुढाकार
शिवशाही न्युज नेटवर्क
सिंदी रेल्वे : सामाजिक बांधिलकी जपत गरजुंच्या मदतीला धावुन जाणे, हीच खरी समाजसेवा आहे. याच भावनेतून लोककल्याण फाउंडेशनच्या वतीने अंथरुणाला खिळलेल्या रुग्णाला आधुनिक रुग्ण पलंग भेट देण्यात आला. फाउंडेशनचे शिवेश कावळे यांच्या संवेदनशील पुढाकारामुळे रुग्णाला मोठा दिलासा मिळाला असुन, त्यांच्या रुग्णसेवेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहरातील अशोकबाबु कलोडे यांच्या पत्नी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दीर्घकाळापासुन अंथरुणावर आहेत. अशा परिस्थितीत रुग्णाची दैनंदिन देखभाल करताना कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही गरज लक्षात घेऊन लोककल्याण फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना आधुनिक रुग्ण पलंग उपलब्ध करून देण्यात आला.
या पलंगामुळे रुग्णाच्या देखभालीसाठी कुटुंबीयांना अधिक सुविधा मिळणार असून, रुग्णालाही आरामदायी व सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत होणार आहे.
केवळ मदत नव्हे, तर माणुसकीचा आधार!
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा गरजूंच्या अडचणींकडे दुर्लक्ष होते. मात्र, गरजु रुग्णांच्या समस्या ओळखून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, हीच समाजसेवेची खरी ओळख आहे. लोककल्याण फाउंडेशनचा हा उपक्रम केवळ एका वस्तुची भेट नसून, अडचणीच्या काळात एका कुटुंबाला दिलेला माणुसकीचा आधार आहे.
शिवेश कावळे यांच्या पुढाकारातुन राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. गरजु रुग्णांना आवश्यक वैद्यकीय व दैनंदिन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची आज नितांत गरज आहे.
लोककल्याण फाउंडेशनच्या या संवेदनशील उपक्रमातुन ‘रुग्णसेवा हीच खरी मानवसेवा’ विचाराचा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला आहे.

