संपुर्ण गाव शोकसागरात
शिवशाही न्युज नेटवर्क
घोराड : श्री क्षेत्र घोराड येथील तरुण मारुती पांडुरंग उईके (वय २४) यांचे आकस्मिक निधन झाल्याने संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मनमिळावु, कष्टाळु आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा तरुण म्हणुन मारुती यांची गावात तसेच मित्रपरिवारात विशेष ओळख होती.
मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी मारुती यांना छातीत जळजळ होत असल्याने तसेच अस्वस्थ वाटत असल्याने उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मित्रमंडळींनी सेवाग्राम रुग्णालयात धाव घेतली.
मारुती हे जिवलग गणेश मंडळाचे सक्रिय सदस्य होते. कोणतेही काम असो, ते तत्परतेने पुढे येत असल्याने त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांच्या मनमिळावु स्वभावामुळे ते लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये परिचित होते.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या आपल्या कुटुंबाचा आधार बनुन मारुती आई-वडिलांची काळजी घेत होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाचा आधारच हरपला असुन, परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
काल दुपारी स्थानिक मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मित्रमंडळी, नातेवाईक तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मारुती यांच्या आकस्मिक निधनाने घोराड गावात आणि मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे.

शिवशाही न्युज नेटवर्क तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
