पाच वर्षांपासुन फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या; सुनील यादव व दिनेश महल्ले यांच्या सतर्कतेला यश
शिवशाही न्युज नेटवर्क
नागपुर : पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या प्रशांत उर्फ सोनु शंकर चौधरी (वय ३४) याला नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ६ ने अखेर जेरबंद केले. आरोपीच्या दुचाकीचा माग काढत पोलिसांनी थंडीत रात्रभर परिसरात पाळत ठेवली. पहाटे आरोपी दुचाकीजवळ येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन २०२१ मध्ये घडलेल्या खुन व दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यात आरोपीचा सहभाग असल्याचे वृत्त आहे. गुन्हा घडल्यानंतर तो फरार झाला होता. त्याच्याविरुद्ध वर्धा जिल्ह्यातील देवळी पोलीस ठाण्यातही खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे बातमीत नमुद आहे.
दुचाकीच्या धाग्यावरून आरोपीचा शोध
आरोपीकडे दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र तो नेमका कुठे आहे, याबाबत निश्चित माहिती नव्हती. पोलिसांनी सोमवारी रात्री चणकापुर कॉलनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. मध्यरात्रीनंतर संशयित दुचाकी दिसून आली; मात्र आरोपी हातातून निसटु नये म्हणून पोलिसांनी रात्रभर त्याच परिसरात दबा धरून ठेवला.
सकाळी आरोपी दुचाकीजवळ येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे गुन्हे शाखेच्या पथकाच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिस निरीक्षक भरत कनाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
