रब्बी हंगामाच्या यशस्वी नियोजनासाठी घोराडमध्ये विशेष सभा; पाणी व्यवस्थापनापासुन पीक संरक्षणापर्यंत दिली महत्त्वपुर्ण माहिती
शिवशाही न्युज नेटवर्क घोराड
शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, शेतीचा खर्च कमी व्हावा आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून रब्बी हंगाम यशस्वी व्हावा, या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने घोराड येथील भवानी माता मंदिरात शेतकरी मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी ९ वाजता झालेल्या या सभेला परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी के. के. जाधव (सेलू) यांनी रब्बी हंगामाचे पुर्वनियोजन, हवामानाचा पिकांवरील परिणाम, जमिनीतील ओलावा, सिंचनाचे नियोजन, पाणी व्यवस्थापन, माती व पाणी परीक्षण, पीक संरक्षण,जलतारा योजना आणि विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती दिली.
हवामानातील बदल लक्षात घेऊन पिकांची निवड, योग्य वेळी पेरणी आणि पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
सभेच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी सहायक वैशाली लोंढे (घोराड), योगीता केदारी (हिंगणी) आणि कृषी सखी पुष्पा आंबटकर यांनी सहकार्य केले.
केवळ हंगाम सुरू झाल्यानंतर नव्हे, तर हंगामापुर्वीच योग्य नियोजन केल्यास शेतीतील संभाव्य नुकसान टाळता येते. याच दृष्टीने कृषी विभागाने घेतलेला पुढाकार शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरला.
