पहिल्या फेरीत भाजपची आघाडी, दुसऱ्या पसंतीच्या मतांनी काँग्रेसचा विजय; नागपूर पदवीधर निवडणुकीत ‘कराळे गुरुजींच्या मतांचे’ ठरले महत्त्व!
राजेश वरटकर
मुख्य संपादक
शिवशाही न्युज नेटवर्क
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मतपत्रिकेवरील ‘२’ या अंकाने विजयाचे संपुर्ण गणित बदलून टाकले. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे आघाडीवर असताना, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या हस्तांतरणानंतर काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी विजय मिळवला. या निवडणुकीत दुसऱ्या पसंतीची मते निर्णायक ठरली असून, मतपत्रिकेवरील ‘२’ हा विजयाचा किंगमेकर ठरल्याचे चित्र समोर आले आहे.
पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला मतांचा कोटा पुर्ण करता आला नव्हता. त्या वेळी भाजपचे सुधाकर कोहळे आघाडीवर होते. त्यामुळे सुरुवातीला भाजपच्या विजयाची शक्यता व्यक्त केली जात होती.
मात्र, बाद झालेल्या उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र बदलले. विशेषतः अपक्ष उमेदवार नितेश कराळे (कराळे गुरुजी) यांच्या मतपत्रिकांवरील दुसऱ्या पसंतीच्या मतांचे हस्तांतरण निर्णायक ठरले.
या मतांच्या जोरावर अभिजित वंजारी यांनी भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यावर मात केली.
अखेर अभिजित वंजारी यांना ६७ हजार २३१ मते, तर सुधाकर कोहळे यांना ६३ हजार ९६० मते मिळाली. दोन्ही उमेदवारांमध्ये ३ हजार २७१ मतांचा फरक राहिला.
काय आहे पसंती क्रम २ चे महत्त्व?
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकल संक्रमणीय मतपद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीत मतदार पहिल्या पसंतीच्या उमेदवारासमोर ‘१’ हा अंक लिहितो. त्यानंतर दुसऱ्या पसंतीसाठी ‘२’ आणि पुढील पसंतीक्रम नोंदवणे ऐच्छिक असते.
पहिल्या फेरीत कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा मिळाला नाही, तर कमी मते मिळालेल्या उमेदवाराला बाद केले जाते. त्याच्या मतपत्रिकांवरील पुढील वैध पसंतीची मते नियमानुसार इतर उमेदवारांकडे हस्तांतरित केली जातात.
यामुळे पहिल्या पसंतीचा उमेदवार पराभुत झाला, तरी मतदाराने नोंदवलेली दुसरी पसंती निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकु शकते.
मतदाराचा प्रत्येक पसंतीक्रम महत्त्वाचा!
पारंपरिक निवडणुकीत एका उमेदवाराला दिलेले मत त्याच्या पराभवानंतर दुसऱ्या उमेदवाराच्या विजयासाठी उपयोगी पडत नाही. मात्र, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पुढील पसंती नोंदवली असल्यास मतपत्रिकेवरील मत पुढील मतमोजणीच्या टप्प्यात महत्त्वाची भुमिका बजावु शकते.
नागपुर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निकालाने हेच स्पष्ट केले आहे. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडी असणे म्हणजे विजय निश्चित होणे नाही. मतांचे हस्तांतरण आणि पुढील पसंतीचा क्रम विजयाचे समीकरण बदलु शकतो.
मतपत्रिकेवरील ‘२’चा करिष्मा, दुसऱ्या पसंतीच्या मतांचे महत्त्व आणि अभिजित वंजारी यांचा विजय यामुळे नागपूर पदवीधर निवडणुक चर्चेचा विषय ठरली आहे.
