वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन; विदर्भातील चंद्रपुर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यांचाही समावेश
शिवशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील हवामानात बदल होण्याची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने आज मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी राज्यातील सात जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सिंधुदुर्ग, कोल्हापुर, लातुर, नांदेड, गडचिरोली, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान बदलाचा प्रभाव जाणवू शकतो.
विदर्भातील चंद्रपुर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांचाही या इशाऱ्यात समावेश असल्याने नागरिकांनी हवामानाच्या परिस्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी
अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. शेतातील कामे करताना हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा. वीज चमकत असताना झाडाखाली किंवा उघड्या मैदानात थांबणे टाळावे.
दिवाळीच्या पार्श्वभुमीवर सतर्कता
दिवाळीच्या सणाच्या तयारीला वेग आला असताना हवामानातील बदलामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. वादळी वाऱ्याच्या वेळी फटाके फोडणे टाळावे तसेच लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस आणि वादळी हवामान राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अधिकृत हवामान सुचना लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
