मंगेश गोमासे/प्रतिनिधी
सेलू : येथील मेडिकल चौकातील जागृत हनुमान मंदिरात काला व महाप्रसाद वितरण करत भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या वातावरणात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मेडिकल चौकातील सुमारे शंभर वर्षे जुने पिंपळाच्या वृक्षाखाली वसलेले हे जागृत हनुमान मंदिर परिसरातील श्रद्धास्थान मानले जाते. येथे दररोज अखंड पूजा-अर्चा होत असुन सकाळ-संध्याकाळ नियमित आरती केली जाते. मंदिरातील पुजारी मुन्ना प्रसाद अग्निहोत्री हे निस्वार्थ भावनेने सेवा बजावत आहेत.
हनुमान जयंतीनिमित्त पहाटे मुन्ना महाराज यांच्या हस्ते विधिवत पुजा-अर्चा व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भक्तिमय वातावरणात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
यानंतर किशोर करंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी काल्याचे भजन सादर करून वातावरण अधिक भक्तिमय केले. दुपारी तीन वाजेपर्यंत काला वितरण करण्यात आले, तर सायंकाळी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ परिसरातील मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला.
