शिवशाही न्युज नेटवर्क
जालना जिल्ह्यातील मुंबई -नागपुर समृद्धी महामार्गावर बुधवारी सायंकाळी भीषण अपघाताची घटना घडली. ट्रकने महिंद्रा पिकअपला जोरात धडक दिल्याने हा भयंकर अपघात झाला. या दुर्दैवी आणि भीषण अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये अनेक महिला मजुरांचा समावेश होता. जालन्यातील कडवंची शिवारात हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळावर लेकरांचा आक्रोश पाहुन प्रत्येकाचे काळीज चिरले.
बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या आसपास नागपुर ते मुंबई या समृध्दी महामार्गावर जालन्यातली कवडची परिसरात एका भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने महिंद्रा पिकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यु झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले. ही धडक इतकी भयंकर होती की पिकपअचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहतुक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत तात्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. अपघातामधील जखमींना तातडीने जवळच्या सरकारी रूग्णालयात दाखल कऱण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासुन समृद्धी महामार्गावरील गवत काढण्याचे काम सुरू होते. त्यासाठी काही स्थानिक महिलांची निवड करण्यात आली आहे. बुधवारी गवत काढण्याच्या कामासाठी बदनापुर तालुक्यातील केळीगव्हाण आणि खादगाव येथील काही कामगार महिलांना बोलवण्यात आले होते. दिवसभराचे काम संपल्यानंतर महिला पिकअपमध्ये समृद्धी महामार्गाने जात होत्या. पण त्याचवेळी काळाने घाला घातला.
समृध्दी महामार्गावरील जामवाडी परिसरात पिकअप व्हॅन थांबवली होती. त्यावेळी नागपुर कडुन मुंबईच्या दिशेने वेगात जाणाऱ्या ट्रकवरील नियंत्रण सुटले अन पिकअपला जोरात धडक दिली. ट्रकची ही धडक एवढी भीषण होती की ८ जणांचा जागीच मृत्यु झाला. या दुर्दैवी अपतानंतर जालना जिल्ह्यात शोककळा पसरली. एकाचवेळी ८ जणांचा मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या अपघातावर दुख व्यक्त केले.
*मृतकांच्या वारसांना शासकीय मदत*
जालनानजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या एका अपघातात 8 जणांचा मृत्यु झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे लोक जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि स्थानिक प्रशासन समन्वय साधुन आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक स्वतः तेथे आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

