मोठ्या भावाने कुऱ्हाडीने लहान भावाची केली निर्घृण हत्या; चिमुर तालुक्यातील शंकरपुर हादरले
शिवशाही न्युज नेटवर्क
चंद्रपुर
रक्षाबंधनानिमित्त घरी आलेल्या बहिणीसाठी करण्यात आलेल्या मटणाच्या बेतातील उरलेल्या भाजीवरून झालेल्या क्षुल्लक वादाने थेट हत्येचे भयावह रूप धारण केले. दारूच्या नशेत संतापलेल्या मोठ्या भावाने आपल्या लहान भावावर कुऱ्हाडीने डोक्यावर आणि मानेवर प्राणघातक वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातील शंकरपुर येथे घडली.
या घटनेत रमेश श्रीराम बनकर (५५) यांचा जागीच मृत्यु झाला असुन, त्यांचा मोठा भाऊ जगन श्रीराम बनकर (६०) याला भिसी पोलिसांनी अटक केली आहे. या रक्तरंजित घटनेने शंकरपुर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जगन, रमेश आणि त्यांचा दिव्यांग भाऊ किशोर हे तिघे एकत्र राहत होते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांची बहीण घरी आली होती. तिच्यासाठी मटणाचा बेत करण्यात आला होता. बहीण राखी बांधून घरी परतल्यानंतर सायंकाळी उरलेल्या मटणाच्या भाजीवरून जगन आणि रमेश यांच्यात वाद सुरू झाला.
दोघांनीही मद्यप्राशन केले असल्याने किरकोळ वाद काही क्षणांतच विकोपाला गेला. संतापाच्या भरात जगन याने घरातील कुऱ्हाड उचलली आणि रमेश यांच्या डोक्यावर व मानेवर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या रमेश यांचा घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात मृत्यु झाला.
घटनेची माहिती मिळताच भिसी पोलिसांसह शंकरपुर पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून तो ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर आरोपी जगन बनकर याला पोलिसांनी अटक केली.
एका क्षुल्लक कारणावरून सख्ख्या भावानेच आपल्या भावाचा जीव घेतल्याने शंकरपुर गाव हादरले असुन, या घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भिसी पोलीस करीत आहेत.

