सिंदी पोलिस झोपेत आहेत का? अल्पवयीन बाईकस्वारांचा शहरात बेधडक धुमाकुळ!
वाहतुक नियमांची खुलेआम पायमल्ली; भरधाव दुचाकींमुळे नागरिकांचा जीव धोक्यात -मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?
विशेष प्रतिनिधी
सिन्दी रेल्वे
सिंदी शहरात अल्पवयीन मुलांच्या हातात सर्रासपणे दुचाकींची चावी दिली जात असून, शहरातील रस्त्यांवर अल्पवयीन बाईकस्वारांचा अक्षरशः बेधडक धुमाकुळ सुरू आहे. वाहतुक नियमांची खुलेआम पायमल्ली होत असताना सिंदी पोलिस प्रशासन मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देणार कधी, असा संतप्त सवाल नागरिकांकडुन उपस्थित केला जात आहे.
शाळा, महाविद्यालय परिसरासह शहरातील प्रमुख रस्त्यांवर अल्पवयीन मुले भरधाव वेगाने दुचाकी चालविताना दिसुन येत आहेत. एका दुचाकीवर तिघेजण बसणे, हेल्मेट न वापरणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे तसेच वाहतुक नियमांना केराची टोपली दाखविण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.
या बेफाम दुचाकीस्वारांमुळे पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच इतर वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. एखाद्या क्षुल्लक चुकीमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असतानाही या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
पालकांचीही तितकीच जबाबदारी!
अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी देणाऱ्या पालकांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही जोर धरत आहे. मुलांच्या हौसेपोटी त्यांच्या जीवितासोबतच रस्त्यावरून जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात घालणे कितपत योग्य, असा सवाल उपस्थित होत आहे.
*मोठा अपघात झाल्यावरच होणार का कारवाईचा बडगा*?
शहरात एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच सिंदी पोलिस प्रशासन जागे होणार का? असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत. केवळ कागदोपत्री कारवाई करून चालणार नाही, तर पोलिसांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अल्पवयीन वाहनचालकांविरोधात विशेष आणि कठोर मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
अल्पवयीन बाईकस्वारांवर कारवाई करण्यासोबतच त्यांना दुचाकी देणाऱ्या पालकांवरही नियमानुसार जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
आता प्रश्न एकच
सिंदी पोलिस ठोस कारवाई करणार की एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहणार?

