शिवशाही न्युज नेटवर्क
-भक्तनिवासच्या रस्त्यावर भ्रष्टाचाराचा थरच थर
सेलू : श्रीक्षेत्र घोराड येथील श्री संत केजाजी महाराज भक्तनिवासासमोरील सिमेंट रस्त्याचे काम म्हणजे विकासाच्या नावाखाली सुरू असलेला उघड लुटप्रपंचच असल्याचे चित्र समोर आले आहे. मजबुतीकरणाच्या नावाखाली मातीवरच थेट काँक्रिट टाकुन जनतेच्या पैशांचा अक्षरशः चुराडा केला जात असल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेली बेस लेयर, दर्जेदार मुरम, योग्य दाबणी या सर्व नियमांना फाटा देत काम सुरू आहे. साईड पट्ट्याचे खोदकाम करून त्यात मातीमिश्रित मुरम टाकण्यात आला आणि त्यावरच थेट काँक्रिट ओतले जात असल्याने हा रस्ता काही दिवसांतच खचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकारामुळे संतप्त नागरिक “हा रस्ता नाही, तर भ्रष्टाचाराचा सापळा असुन संबंधित ठेकेदार अजुन किती अंत पहात आहे” अशी चर्चा सुरू आहे,विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार उघडपणे सुरू असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडुन मात्र संशयास्पद शांतता पाळली जात आहे. त्यामुळे ‘वरिष्ठांचे मौन म्हणजे संमती?’ असा थेट
सवाल उपस्थित होत आहे.
स्थानिक पातळीवर अशी जोरदार चर्चा आहे की, काही नेत्यांच्या जवळच्या लोकांना काम देण्यात आल्याने अधिकाऱ्यांकडुन हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे हा केवळ निकृष्ट कामाचा प्रश्न नसुन संपुर्ण व्यवस्थेतील
सडलेपणाचे प्रतीक ठरत आहे.
श्री क्षेत्र घोराड सारख्या पवित्र क्षेत्रात भाविकांसाठी बनवला जाणारा रस्ता जर असा निकृष्ट दर्जाचा असेल, तर सामान्य नागरिकांच्या कामांची अवस्था काय असेल, याची कल्पनाच करवत नाही.
*तात्काळ चौकशी करा, दोषींना शिक्षा द्या*
ग्रामस्थांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर क
ठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे. अन्यथा, येत्या काळात तिव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

