सेलू तालुका प्रतिनिधी..
………………………..
सेलू तालुक्यातील कोलगाव येथे कुंवारा भिवसेन (भिमालपेन) जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात हा जन्मोत्सव साजरा होत असून परिसरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भीमालपेन पेनठाणा कोलगाव येथे प्राचीन पायऱ्यांची विहीर असून त्यालगत भीमालपेन देवस्थान सुद्धा अतिशय प्राचीन असल्यामुळे त्याच संगोपन संपूर्ण आदिवासी समाज करत असते या निमित्ताने बुधवार दि. ०१ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजता भिमालपेन व शीतलादेवी यांच्या ज्योती प्रज्वलित करण्यात येणार आहेत. तसेच शनिवार दि. ०२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार असून भीमालपेन शोभायात्रा काढण्यात येत असून उत्सव काळात विविध धार्मिक विधी, भजन, गोंडी नृत्य, समाज मेळावे तसेच पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः पंचमी निमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती अपेक्षित असून, समाजातील एकात्मता व परंपरा जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार आहे.
कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार सकाळी व सायंकाळी नियमित पूजा-अर्चा, भजन-कीर्तन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात सेलू व आजूबाजूच्या भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम कुंवारा भिवसेन (भिमालपेन) पेनठाणा सेवा समिती कोलगाव व गोंडवाना युवा उत्सव समिती, तालुका सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांकडून जय सेवा, जय जोहारचा संदेश देत सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
