मुंबई: आपल्या तत्ववादी आणि कायदेशीर, संवैधानिक मार्गाने कर्तव्य बजावणारे धडाडीचे आणि डॅशिंग अधिकारी म्हणुन महाराष्ट्राला परिचित असलेल्या तुकाराम मुंढे यांनी नुकतेच राज्याच्या आपत्ती व निवारण विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली. दिव्यांग कल्याण विभागातही त्यांनी आपल्या कामाची चुणुक दाखवुन दिली होती. दरम्यान दोन दिवसांपुर्वी त्यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने ते आपला प.बंगालचा दौरा सोडुन बीड जिल्ह्यातील ताडसोना या मुळगावी पोहोचले होते. याच गावी त्यांच्या आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर पुढील पारंपरिक विधी न करता तुकाराम मुंढेंनी विज्ञान आणि विवेकवादी विचार जपत आदर्श निर्माण केलाय.
आपल्या आईच्या अंत्यसंस्कारा नंतर तुकाराम मुंढेंनी तिसऱ्याच दिवशी सर्व विधी पुर्ण केले तसेच अस्थींचे विसर्जन नदीत न करता आपल्या शेतातच खड्डा खोदुन तिथे वडाचे झाड लावुन पुर्ण केले. त्यांच्या या पुरोगामी विचारांचं सोशल मीडियातुन कौतुक होत आहे. आता, तुकाराम मुंढे यांनीच याबाबत सोशल मीडियात पोस्ट करुन माहिती दिली.
”आमच्या “बाईंच्या” (आईच्या) स्मृतीप्रित्यर्थ आम्ही एक वेगळी आणि विचारपुर्वक वाट निवडण्याचा संवेदनशील व विवेकवादी निर्णय मुंढे परिवारातर्फे घेतला आहे. “निसर्ग हाच या सृष्टीचा निर्माता आणि सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. त्याचे रक्षण, संवर्धन आणि सन्मान करणे हीच खरी भक्ती आणि खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे.” या विचारातुन प्रेरित होऊन आम्ही आईच्या अस्थींचे पारंपरिक पद्धतीने नदीत विसर्जन न करता त्या शेतात वृक्षारोपणासह विसर्जित केल्या आहेत असे तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे. आम्ही त्या ठिकाणी वडाचे झाड लावले आहे. जेणेकरून आमच्या “बाईंची” माया सावलीच्या रूपाने पिढ्यानपिढ्या जिवंत राहील. हा वटवृक्ष आमच्या बाईंच्या मायेची सावली आणि “जिजींचे” आशीर्वाद बनुन पिढ्यानपिढ्या बहरत राहील अशी भावनिक आणि रुढी परंपरेला फाटा देत आपण पुढे जात असल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी आज व्यक्त केलीय.
ना दहावा ना तेरवा
आम्ही कोणत्याही प्रकारचा दहावा किंवा तेरवा न करण्याचा निर्णय घेतला आहे. विवेकवाद आणि विज्ञानाची कास धरून, सामाजिक उपयुक्ततेला आम्ही प्राधान्य दिले आहे. आजच्या आधुनिक युगात विज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे. त्यामुळे सामाजिक उपयुक्तता आणि पर्यावरणाचे रक्षण करणे, हेच आमच्या आईच्या संस्कारांना साजेसे ठरेल असे तुकाराम मुंढेंनी म्हटलं तसेच आमच्या या निर्णयाचा आपण आदर कराल आणि “बाईंच्या” आठवणी आपल्या हृदयात कायम जपुन ठेवाल हीच नम्र अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय. दरम्यान, आम्ही सर्व भाऊ आमच्या आईला “बाई” म्हणुन संबोधित असु तर गावकरी आणि आप्तेष्टांसाठी त्या “जिजी” होत्या, असेही मुंढेंनी सांगितलं.

