

राजेश वरटकर
मुख्य संपादक
श्री क्षेत्र उत्तर वाहिनी बेलगाव येथे आयोजीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञात हरि भक्त परायण पुंडलीक महाराज बोळवटकर यांनी हरिनामाच्या महिम्याचे अत्यंत प्रभावी वर्णन केले. स्वयंभु सिद्धेश्वर महादेव मंदिरात श्री संत लुंगे बाबा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजीत या ज्ञानयज्ञात प्रथम पुष्प गुंफताना त्यांनी मार्गदर्शन केले.
महाराज म्हणाले की, आपल्या जिवनात येणाऱ्या दुःखांचे मुळ कारण म्हणजे आपण नकळत दररोज करीत असलेले पाप. चालताना, वावरताना सुक्ष्म जिव-मुंग्या, किडे यांची हत्या आपल्याकडुन होते. त्यामुळे संतांनी एकादशी चे महत्त्व सांगितले आहे. एकादशी माहात्म्यात देखील जिवहिंसा टाळण्याचे महत्त्व अधोरेखित केले असुन, अगदी समिधा जाळण्यापुर्वी ती पाण्याने धुऊन वाळवावी, जेणेकरून त्यावरील जिवजंतुंचे रक्षण होईल, असे सांगितले आहे. मात्र, आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे दिवसेंदिवस पाप साचत जाते.
या पापांच्या निरसनासाठी संतांनी सांगितले प्रमाणे दर पंधरा दिवसांनी येणारी एकादशी श्रद्धेने पाळावी, फलाहार करावा आणि आत्मशुद्धी साधावी, असे त्यांनी सांगितले. तसेच, रोज मंदिरात जाऊन संतांचे चरण स्पर्श करणे, त्यांच्या आचार-विचारांचे आचरणात रूपांतर करणे, साधना करणे, पवित्रता राखणे आणि पायी तिर्थयात्रा करणे यावरही त्यांनी भर दिला.
हरिनामाच्या जपाचे महत्त्व सांगताना महाराज म्हणाले की, हरिपाठ मध्ये “हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी” या अभंगात १०८ वेळा ‘हरि’ नाम येते. या ‘हरि’ नामात पापमुक्तीची अद्भुत शक्ती दडलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने हरिनामाचा जप, हरिपाठ आणि भक्तीमार्गाचा अवलंब करून जीवन पवित्र करावे, असे आवाहन त्यांनी केले.

