प्रतिनिधी/सेलु
सेलू तालुक्यातील कोलगाव शेतशिवारात सोमवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोन वर्षीय चिमुकलीचा पाण्याच्या टाक्यात बुडून मृत्यु झाला. कु. पल्लवी निलेश कुमार (वय २ वर्ष) असे मृत बालिकेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलगाव शेतशिवारातील निळकंठ वरटकर यांच्या पोल्ट्री फार्मवर मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील जमुनिया केसरी येथील काही मजुर कुटुंबांसह कामासाठी वास्तव्यास आहेत. सोमवारी दुपारी शेतातील घरासमोरील अंगणात काही मुले खेळत होती. याचवेळी चिमुकली पल्लवी ही जनावरांसाठी ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गेली आणि दुर्दैवाने टाक्यात पडून बुडाली.
काही वेळानंतर कामावर असलेल्या मजुरांनी टाकीजवळ जाऊन पाहिले असता पल्लवी पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळुन आली. तातडीने तिला बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यु झाला होता.
घटनेची माहिती मिळताच सेलु पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सेलु ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असुन, पुढील तपास सेलु पोलीस करीत आहेत.

