🔥 नंदी चौकातील दुकानात नागरिकांची गर्दी
दिनेश घोडमारे
सिन्दी (रेल्वे) प्रतिनिधी

सिंदी (रेल्वे): निसर्गाच्या किमयेचे अनेक प्रकार आपण ऐकतो, मात्र सिंदी रेल्वे शहरात सध्या एका वेगळ्याच ‘चमत्कारी’ अंड्याची चर्चा रंगली आहे. येथील बाजार लाईन परिसरातील नंदी चौकात असलेल्या एका अंडी विक्रीच्या दुकानात चक्क हुबेहुब ‘आंब्या’सारखा आकार असलेले अंडे आढळुन आले आहे. हे अंडे पाहण्यासाठी सध्या सिंदी शहरात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून नागरिकांची दुकानावर गर्दी होत आहे.
नेमकी घटना काय? बाजार लाईनमधील नंदी चौकात सचिन तान्हा झाडे यांचे अंड्याचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे सचिन आपल्या दुकानात अंड्यांचे ट्रे लावत असताना, एका ट्रेमध्ये त्यांना एक विचित्र आकाराचे अंडे दिसले. सामान्यतः अंडे लंबवर्तुळाकार असते, मात्र हे अंडे एका बाजूने वळलेले असुन त्याला चक्क ‘कोकणी हापूस’ किंवा कैरीसारखा आकार आहे. अंड्याचा हा आगळावेगळा आकार पाहुन सचिन झाडे स्वतःही थक्क झाले. ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि बघता बघता नंदी चौकातील त्यांच्या दुकानावर हे ‘आंबा-अंडे’ पाहण्यासाठी लोकांची रिघ लागली. निसर्गाचा हा चमत्कार आहे की काही वेगळा प्रकार, यावर आता ठिकठिकाणी चर्चा रंगु लागली आहे. अंड्यांचे अनेक क्यारेट्स मी आजवर हाताळले, पण असा आंब्याच्या आकाराचा अंडा पहिल्यांदाच पाहिला. हे निसर्गाचे एक वेगळेच रूप आहे, अशी भावना सचिन झाडे यांनी व्यक्त केली. सध्या हे ‘आंबा’ सदृश्य अंडे सिंदीकरांच्या आकर्षणाचे केंद्र बनले असुन, सोशल मीडियावरही याचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

