बँड, बाजा, वरात आणि जल्लोषात पार पडला लग्नसोहळा
राजेश वरटकर
मुख्य संपादक
सेलु : हिंदु धर्मपरंपरेनुसार अधिक मासात विवाहासारखी शुभकार्ये टाळली जातात. मात्र, या पारंपरिक समजुतीला छेद देत सिंदी रेल्वे लगतच्या दिग्रस येथील वरघणे परिवारातील नवरदेव व वडणेर येथील पडवे कुटुंबातील नवरी मुलगी यांचा विवाह सोहळा रविवारी एका मंगल कार्यालयात मोठ्या धुमधडाक्यात हिंदु रितीरिवाजानुसार पार पडला.दोन्ही परिवाराने अधिक मासातच थाटामाटात विवाह सोहळा पार पाडल्याने संपुर्ण पंचक्रोशीत या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे.
रविवारी सिंदी रेल्वे शहरात निघालेल्या या वरातीत बँड-बाजा, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि नृत्याचा जल्लोष पाहायला मिळाला. भर दुपारी निघालेली वरात नागरिकांचे लक्ष वेधुन घेत होती. पारंपरिक रूढींना फाटा देत आधुनिक विचार स्वीकारणाऱ्या या कुटुंबाच्या निर्णयामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
अधिक मासात शुभकार्य टाळण्याची परंपरा आजही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पाळली जाते. त्यामुळे विवाह, गृहप्रवेश किंवा इतर मंगलकार्यांसाठी लोक पंचांगाचा आधार घेतात. अशा परिस्थितीत अधिक मासात पार पडलेल्या या विवाहामुळे समाजात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या निर्णयाचे स्वागत करत “विचार बदलण्याची गरज” व्यक्त केली, तर काहींनी परंपरा मोडल्याची खंतही व्यक्त केली.
दरम्यान, या विवाह सोहळ्याची चर्चा सोशल मीडियावरही रंगली असुन “परंपरा विरुद्ध आधुनिकता” हा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

