शिवशाही न्युज नेटवर्क
सेलू तालुक्यातील विविध ठिकाणी हनुमान जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री क्षेत्र घोराड येथील श्री संत केजाजी महाराज मंदिर परिसरातील श्री हनुमान मंदिरात पहाटे पाच वाजता हरिपाठ मंडळाने रामनामाचा गजर करत उत्सवाची सुरुवात केली.श्री संत केजाजी महाराज यांच्या हस्ते निर्माण केलेल्या हनुमान मंदीरात पुजा, अर्चन करण्यात आले तसेच हनुमान मुर्ती चा अभिषेक करण्यात आला. यावेळी श्री हनुमंतरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दोनशे वर्षे जुना लाकडी रथावर विराजमान मारुती रायाची विधिवत पूजा करण्यात आली. गुलालाची उधळण करत जन्मोत्सव सोहळा पार पडला. त्यानंतर आरती करून प्रसाद वितरण करण्यात आले.
सायंकाळी ज्ञानदीप भजन मंडळाच्या वतीने भजन संध्याचे आयोजन करण्यात आले असुन पत्रकार संजय धोंगडे व मित्र परिवाराच्या वतीने जगदंबा माता मंदिर परिसरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
*मेडिकल चौकातही उत्सवाची धुम*
सेलू येथील मेडिकल चौकातील जागृत हनुमान मंदिरातही जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. रात्री गणेश अरगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या भजनांनी वातावरण भक्तिमय झाले. पहाटे पुजारी मुन्ना महाराज यांच्या हस्ते हनुमान मुर्तीचे पूजन-अर्चन करण्यात आले.
गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि प्रसाद वितरणाने उत्सवाची रंगत वाढली. सायंकाळी येथेही भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

