मंगेश गोमासे/विशेष प्रतिनिधी
सेलु : तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा दिवसेंदिवस तीव्र होत असुन नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सकाळपासुनच गॅस एजन्सीसमोर लांबच लांब रांगा लागत असून अनेकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभुमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याची चर्चा ग्रामीण भागात रंगत आहे. या परिस्थितीची झळ आता थेट गावपातळीवर जाणवत असुन सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना आपले दैनंदिन कामधंदे सोडुन सकाळीच शहर गाठावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. विशेषतः महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात झाडांची संख्या कमी झाल्यामुळे पारंपरिक इंधनाची टंचाईही जाणवत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांसमोर स्वयंपाकाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
या पार्श्वभुमीवर काही नागरिक इलेक्ट्रॉनिक शेगडीकडे वळत असल्याचे चित्र दिसत असून त्यांची मागणी वाढत आहे. मात्र, वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे हा पर्यायही सर्वांसाठी सोयीचा ठरत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडुन जोर धरत आहे.

