पुलगांव /प्रतिनिधी
मांडवा येथील सुमारे १० हजार कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेला लँको प्रकल्प अखेर लिलाव प्रक्रियेतुन केवळ १७५ कोटी रुपयांत विकला गेल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाने ठरवलेल्या किंमतीपेक्षाही अत्यंत कमी दरात झालेल्या या व्यवहारामुळे विविध स्तरांवर तिव्र प्रतिक्रिया उमटत असुन प्रकल्पाच्या विक्रीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हा प्रकल्प १३२० मेगावॅट क्षमतेचा स्वप्नवत प्रकल्प मानला जात होता. परिसरातील औद्योगिक विकासाला चालना देत सुमारे ५ हजार लोकांना रोजगार मिळेल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रकल्प अर्धवट अवस्थेतच थांबला आणि अखेर लिलावात विकला गेला.
या प्रकल्पासाठी स्थानीक शेतकऱ्यांकडुन सुमारे २७३ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली होती. प्रकल्प बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या पण त्याबदल्यात अपेक्षीत रोजगार किंवा विकास न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान हा प्रकल्प केजरीवाल रिसॉर्ट कंपनीकडुन ‘भंगार भावात’ खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. इतक्या मोठ्या गुंतवणुकीचा प्रकल्प अत्यल्प किमतीत विकला गेल्याने आर्थिक व्यवहार, व्यवस्थापन आणि लिलाव प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिक नागरिकांमध्येही या प्रकरणाबाबत संताप व्यक्त केला जात असुन, “विकासाचे स्वप्न भंगले का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रकल्पामुळे अपेक्षित रोजगार संधी निर्माण न झाल्याने युवकांमध्येही निराशा पसरली आहे.
आता नव्या मालकाकडुन हा प्रकल्प पुन्हा सुरू होणार का, शेतकऱ्यांना न्याय मिळणार का आणि रोजगाराच्या संधी निर्माण होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

